Thursday, 28 December 2017

शेतकरी विधवा रेखाताईंचा एकाकी लढाच्या अकाली अंत

शेतकरी विधवा रेखाताईंचा एकाकी लढाच्या अकाली अंत 
दिनांक २९ डिसेंबर २०१७
दोन दिवसापुर्वी ४५ वर्षीय शेतकरी विधवा रेखाताई ठग यांच्या  १८ वर्षीय  मुलगा चंद्रशेखरचा मला फोन आला व फोन उचलताच त्यांनी रडतच मला  सांगीतले की "मामा आई वारली खरच सांगतो आई मला सोडून गेली ",मला त्याचा बोलण्यावर विश्वास बसेना कारण मागील आठवड्यातच  रेखाताई ठग मला विश्राम गृहात भेटल्या होत्या ,प्रकृती दम्याच्या आजाराने बरोबर राहत नाही अशी तक्रार सुद्धा केली होती मात्र पतीने कर्जबाजारीपणा व नापिकीने त्रस्त झाल्याने मुलगी भाग्यश्री व मुलगा चंद्रशेखर हे अवघे  ६ आणी ४ वर्षाचा असतांना वेणीकोढा येथे आत्महत्या केल्यानंतर आपला मागील १५ वर्षाचा एकाकी लढा मध्येच सोडुन चंद्रशेखरला एकटे सोडुन जातील यावर विश्वास बसत नसल्याने आम्ह्चे विदर्भ जनआंदोलन समितीचे सचिव मोहन जाधव  यांना तातडीने रेखाताई यांच्या भोसा रोडवरील भाड्याच्या झोपडीत पाठविले तेंव्हा त्यांनी मला जी परीस्थिती सांगीतली त्यानुसार कडाक्याच्या थंडीमुळें औषधोपचाराला पैसे नसल्यामुळे दम तोडला होता व चंद्रशेखरच्या खिशात अंतविधीसाठी दमडीही नव्हती ,शेजाऱ्यांनी\व मोहन जाधवानी  मदतीचा हात समोर करून अंतिम क्रिया   आटोपली व रेखाताई ठग यांचा एकाकी लढा काळाच्या पडद्यामागे लोप पावला मात्र या शेतकरी विधवेच्या जीवनाचा संघर्ष समाजाला कळावा यासाठी हा खटाटोप करीत आहे . 
बारा वर्षापुर्वी एकदा दुपारी यवतमाळ वरून फोन आला व एका बाईचा आवाज होता व त्यांनी "मी एक बाभुळगाव तालुक्यातील वेणीकोढा येथील शेतकरी विधवा रेखाताई ठग असून यवतमाळ येथे भोसा रोडवरील झोपडवस्तीत राहत असुन आपली लहान मुलगी व मुलगा याला घेऊन राहत असुन ,काही घरात भांडीकुंडी घासुन उदरनिर्वाह करीत असल्याचे सांगीतले व आपणास भाग्यश्री व चंद्रशेखर यांच्या शिक्षणासाठी मदत करा अशी विनंती केली ,मी तिला यवतमाळला येऊन भेटणार असा निरोप दिला . त्यावेळेस माझ्या सोबत हिंदूचे तात्कालीन ग्रामीण वृत्त संपादक व मॅगसे अवॉर्डचे मानकरी पी .साईनाथ होते आम्ही या संघर्षशील  शेतकरी विधवेला भेटण्याचा निश्चय केला मात्र त्यावेळेस तिला उपजीविकेसाठी शिलाई मशीन देण्याचाही निर्णय घेतला व गाडीत शिलाई मशीन गाडीत टाकुन भोसा रोडवरील तिची एका झोपडीतील भाड्याची खोलीवर भेट दिली व  तेथील तिचा जीवनाचा संघर्ष पाहुन धक्काच बसला व आपण भाग्यश्री व चंद्रशेखर यांच्या शिक्षणासाठी  संपुर्ण मदत करण्याचे आश्वासन देऊन मी आणी पी .साईनाथ तिचे घर सोडले . 
त्यावेळेस शेतकऱ्यांच्या विधवांच्या कल्याणासाठी सामाजिक कार्यकर्ते विजयराव कद्रे यांनी नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने दीनदयाल संस्थेच्या नावावर काम सुरु केले होते आपण त्यांना भाग्यश्री व चंद्रशेखर यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची विनंती केली ती त्यांनी आजपर्यंत पूर्ण करीत असल्याची माहीती मला चंद्रशेखरनी मागील भेटीला दिली . 
मागील १२ वर्षाच्या प्रवासात रेखाताईंनी भांडीकुंडी ,सैंपाक ,दवाखान्यात नौकरी ,ठक्कलगाडीवर दुकान लाऊन  मुलगी भाग्यश्रीला १२ पर्यंतचे शिक्षण दिले ,आपण तिला जोर देऊन संगणक शिक्षण घेण्यास लावले या दरम्यान पी .साईनाथ यांनी आपल्या मॅगसे अवॉर्डच्या राशीतून भाग्यश्रीसाठी रु ५०,००० (पन्नास हजार ) ची मदत दिली ,आपण ती पांढरकवडा येथे सहकारी बँकेत भाग्यश्रीच्या नावाने ठेवीच्या स्वरूपात ठेवले . रेखाताईंचा लढा सुरूच होता त्याचवेळी सर्वोदय कार्यकर्ते बाळासाहेब सरोदे यांच्या   पुढाकाराने वर्धे येथील एक स्थळ घेऊन माझ्याकडे आल्या मात्र जेमतेम १८ वर्षांच्या भाग्यश्रीला पुढील शिक्षणासाठी मी आग्रह धरला होता रेखाताईंच्या हट्टासाठी आपण होकार दिला ,ठेव सुद्धा तात्काळ काढून दिली त्यानंतर विजयराव कद्रे यांनी  आपली उपस्थिती लाऊन भाग्यश्री यांचे लग्न वर्धा येथे मोठ्या प्रेमाने साजरे केले . आज रामनगर वर्धा भाग्यश्री येथे सुखाने संसार करीत आहे . 
मागील दोन वर्षापासुन चंद्रशेखर १०वी झाल्यावर आपली रोजमजूरी करीत आहे ,मातीच्या झोपडीत रेखाताईंना दम्याच्या आजाराने फारच गारद केले होते त्यातच उपचारासाठी पैसे नसल्याने तब्यतीचं संपूर्ण तीन तेरा झाले . मागील माझ्या २५ वर्षाच्या शेतकरी आत्महत्यांचा पाठपुरावा करतांना ज्या शेकडो शेतकरी विधवांच्या संघर्षाला जवळुन अनुभवण्याची संधी मला प्रभूने दिली त्या संघर्षात मला रेखाताईंचा जीवनाचा लढा आदर्श वाटतो ,आज तिचा मुलगा चंद्रशेखर (मोबाईल -८९९९७८२९१७) एकटा पडला आहे सारे नातलग दुरावले आहेत , वडिलांचा साथ  लहानपणी जीवनात मिळाला नाही व आई -वडिलांची भुमिका समर्थपणे  बजावणारी रेखाताई अचानक त्याच्यापासुन दुर गेल्या  आहेत  त्याला आता समाजाने आपल्या कुशीत घेणे गरजेचे आहे यासाठी हा प्रपंच केला . 
आपला 
किशोर तिवारी 
०९४२२१०८८४६
\============
==========

No comments:

Post a Comment