Thursday, 6 November 2014

विदर्भात ४८ तासात आणखी ६ नापिकीग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या : मुख्यमंत्रांनी तात्काळ मदत घोषीत करावी -किशोर तिवारी

 विदर्भात ४८ तासात आणखी ६ नापिकीग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या : मुख्यमंत्रांनी  तात्काळ मदत घोषीत करावी -किशोर तिवारी
६ नोव्हेंबर २०१४
एकीकडे विदर्भाच्या शहरात नवनियुक्त आमदारांचे मोठ्या धामधुमीत सत्कार होत आहेत त्याच वेळी ग्रामीण विदर्भात नापिकी व उपासमारीला तोंड देत असलेले आपली जीवनयात्रा आत्महत्या  करून संपवीत आहेत मात्र या गंभीर विषयावर अधिकारी बघ्याची भूमिका घेत झोपा काढत आहेत कारण मागील ४८ तासात पश्चिम विदर्भात आणखी सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे घटना समोर आल्या आहेत यात यवतमाळ जिल्यात तळणी येथील वामन राठोड ,फुलसावन्गीचे विनोद राठोड ,ब्राह्मणगाव (शामपूर )चे बंडू झिंगापवार  तर वाशीम जिल्यात मनोरा येथे साठीश राठोड ,मालेगाव येथील भगवान जगनाडे तर चांदूरबाजार येथील देविदास  सुर्जोशी यांचा समावेश आहे ,यामुळे यावर्षी विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा आकडा आता ९४२ वर गेला असुन ,विदर्भाच्या शेतकऱ्यांना वाचविण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पाऊले उचलावी अशी विनंती विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. 

'आपण शेतकऱ्यांची होत असलेली उपासमार व प्रचंड नापिकी बद्दल मुख्यमंत्री यांना कल्पना दिली असून शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत त्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांचेशी चर्चा केली असुन तात्काळ मदत घोषित करण्याची  विनंती केली आहे मात्र मुख्यमंत्री इतर कामात गुंतले असल्यामुळे यावर तोडगा निघण्यास विलंब होत आहे व विदर्भ --मराठवाडा मध्ये नापिकीग्रस्त शेतकरी दररोज ३-४ शेतकरी मागील दोन महिन्यापासून आत्महत्या करीत हि शोकांतिका आहे जे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा बाजार करून सत्तेत आलेत त्यांनी लवकरात लवकर या कृषी संकटावर लक्ष द्यावे अशी मागणी सुधा तिवारी यांनी केली आहे . 
या वर्षी संपूर्ण विदर्भात ३० लाख हेक्टर मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात  झाली आहे. शेतकऱ्याचा सोयाबीन वर जर  खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. येरव्ही सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरणी केल्यानंतर आठ ते दहा क्विंटल होणारे उत्पन्न आता केवळ ८० किलोवर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर सुरळीत पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली मात्र पुन्हा पावसाने दगा दिल्यानंतर अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरणी झाल्याने आणि वातावरणातील बदलाने उत्पन्नात कमालीची घट झाली. एरव्ही३० किलो सोयाबीन बियाण्याची लागवण केली की त्यापासून आठ ते दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न व्हायचे. मात्र यावर्षी ३० किलोला ८० किलो अशी सोयाबीनची उतारी आहे. त्यातच सोयाबीन काढणीचा खर्च प्रती बॅग १ हजार ५००रुपये झाला आहे. मशीन आणि ट्रॅक्टरचा खर्च एक हजार रुपये असा २ हजार ५०० रुपये खर्च आहे. याव्यतिरिक्त लागवण आणि मजूरीचा खर्च वेगळा असे असताना काढणीचाच खर्च २ हजार ५०० रुपये उत्पन्न मात्र २ हजार रुपये अशी परिस्थिती तालुक्यात सर्वदूर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेकांनी सोयाबीनची ही उतारी पाहून त्यामध्ये जनावरे सोडणेच पसंत केले आहे मात्र अधिकारी सरकारला अंधारात ठेवत आहेत ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे . 
दिवाळी हा सण सर्वांसाठीच महत्वाचा. तीन दिवसांवर हा सण येऊन ठेपला असताना पैशाची तजवीज करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, आप्तेष्ट, सावकारांचे कर्जासाठी उंबरठे झिजविले जात आहे. असे असताना प्रशासनाकडून या गंभीर परिस्थितीची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. वास्तविक सोयाबीन पिकाचा आतापर्यंत सर्वे व्हायला हवा होता. तसेच शेतकर्‍यांना फुल ना फुलाची पाकळी अशी आर्थिक मदत करून त्यांना दिवाळी सणापूर्वी दिलासा द्यायला हवा होता. 
विदर्भाचे नगदी पिक  कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जाऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकर्‍यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत असून, २० लाख हेक्टर मध्ये कापसाची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. कपाशीचे उत्पन आता एकरी एक ते दोन किंटळचा होणार नाही त्यातच कापसाचा बाजार भाव हमीभावापेक्षा कमी झाला आहे सरकारने तात्काळ कापुस उत्पादक   शेतकऱ्यांची मदत करावी अशी मागणी तिवारी यांनी पुन्हा केली आहे .
निसर्गाच्या लहरीपणासोबतच वीज वितरणाचा मनमानी कारभारही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. सध्या कृषी फिडरवर २२ तासाचे भारनियमन होत आहे. केवळ दोन तास वीज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे,मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकर्याना फक्त देवच वाचवू शकतो कारण सर्वच नेते शेतकऱ्यांच्या कबरीवर बसून सत्ता काबीज करण्याचा प्रयन्त करीत आहेत याला आता शेतकऱ्यांनीच उत्तर देणे गरजेचे आहे मात्र शेतकरी जाती राजकारणात आंधळा झाल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली .

No comments:

Post a Comment