Monday, 17 March 2014

अराजक हेच केजरीवाल यांचे धोरण-विजय दर्डा

अराजक हेच केजरीवाल यांचे धोरण-विजय दर्डा
लोकमत पत्रसमूहाचे एडिटर इन चीफ

डिसेंबर २0१३च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आमआदमी पार्टीला २८ जागा मिळून तो एक महत्त्वाचा पक्ष ठरला, तेव्हा राजकीय पक्ष, मीडिया आदी सर्वांनाच धक्का बसला. पण, सामान्य माणसाला मात्र हा एक दिलासा वाटला. आपल्याला एक राजकीय पर्याय सापडला आहे, असेच त्याला वाटले. नेहमीच्या राजकीय पक्षांखेरीज आणखी एक पर्यायी पक्ष आपल्याला मिळाला आहे, अशीच त्यांची धारणा झाली आणि लगोलग येत्या निवडणुकीवर आम आदमी पार्टीचा काय परिणाम होईल, याची चर्चा सुरू झाली. नरेन्द्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेला काँग्रेसचा नाही, तर आम आदमी पार्टीचे नेते केजरीवाल यांचा खरा धोका आहे, असेही बोलले जाऊ लागले. पण हे मत म्हणजे मोदींना लोक स्वीकारत असल्याची पावती नव्हती, तर तो फक्त काँग्रेसविषयीच्या असंतोषाचा सूर होता.
आम आदमी पार्टीचा व त्याच्या नेत्याचा गेल्या काही महिन्यांपासूनचा एकंदर रागरंग पाहिल्यानंतर डिसेंबर २0१३ मध्ये या पक्षाविषयी निर्माण झालेल्या सर्व आशा मार्च २0१४ मध्ये मावळल्या आहेत, असे एकदम म्हणता येणार नाही; परंतु या आशा पल्लवित व्हाव्यात अशीही स्थिती नाही. पक्षाविषयीची नकारात्मक भावना वाढीस लागली आहे आणि प्रारंभी जो राजकीय पर्याय या पक्षात दिसला होता, तो प्रारंभिक आश्‍वासनांच्या पलीकडे गेलेला नाही.
हल्लीच्या २४ तास चालणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या जमान्यात एखादय़ा नेत्याचा उदय आणि अस्त हा त्या माध्यमांवर अवलंबून असतो, हेही दिसून आले आहे. एखादय़ाचा चेहरा या माध्यमाने दाखविणे बंद केले की तो चेहरा लोकांच्या विस्मरणात जातो, हेही स्पष्ट झाले आहे. केजरीवाल हा माध्यमांनी मोठा केलेला माणूस आहे.अण्णा हजारे यांना जनलोकपाल आंदोलनाचा चेहरा म्हणून आणि अरविंद केजरीवाल यांना आंदोलनाचे संघटक म्हणून मीडियाने प्रसिद्धी दिली नसती, तर आपण आज ह्यआपची चर्चा करीत बसलो नसतो. अर्थात, हे आंदोलन हाताळण्यात सरकारला आलेल्या अपयशामुळेही ह्यआपची चर्चा वाढली आहे. पण मीडियाने या आंदोलनाचा गवगवा केला नसता, तर ह्यआपला आज जे स्थान प्राप्त झाले आहे, ते झाले नसते आणि जन्म घेण्यापूर्वीच या पक्षाने राम म्हटला असता. जंतरमंतर आणि रामलीला मैदानावरील लोकपाल आंदोलनाला जी भडक प्रसिद्धी मिळाली त्यातच ह्यआपचा पाया घातला गेला. ज्या मीडियाने आपल्याला मोठे केले आहे, त्या मीडियाबद्दल केजरीवाल कृतज्ञ राहतील व मीडियाचा आदर करतील, अशी अपेक्षा होती; पण तशी अपेक्षा करणे म्हणजे आजच्या संधिसाधू राजकारणाचे भान विसरणे होय. हल्ली सर्व काही गरजेपुरते असते. त्यामुळेच केजरीवाल आता मीडियावर, तो विकला गेला असल्याचा आरोप करीत आहेत. ते सत्तेवर आल्यानंतर मीडियावाल्यांना जेलमध्ये टाकण्याचीही भाषा करीत आहेत. ही भाषा केवळ माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आहे. त्याचा कुणावरही परिणाम होणार नाही. त्यामुळे मीडियाची विश्‍वासार्हताही कमी होणार नाही. केजरीवाल हे मीडियाला आपल्यासाठी वापरण्यात वाक्बगार आहेत. मीडियावर हल्ला करून प्रसिद्धी मिळविण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते अशी जी काही खळबळजनक विधाने करीत आहेत, त्याचा फायदा त्यांना निवडणूक प्रचार मोहिमेत होईल, पण नंतर सार्‍यांनाच त्याचा विसर पडेल. आंदोलनाच्या भडक प्रसिद्धीची सर्व व्यवस्था कशी झाली, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कधीच द्यावे लागणार नाही, याची त्यांना जाणीव आहे. या प्रसिद्धीचा खर्च त्यांनी स्वत:च केला, की त्यांच्या बोलवित्या धन्याने केला? आपल्या राजकीय संस्कृतीत कोणताही सबळ पुरावा सादर न करता बेजबाबदार आरोप करण्याची मुभा आहे. त्यामुळे प्रसिद्धीही मिळते आणि राजकीय लाभही होतो.
हा सगळा अराजक माजविण्याचा प्रकार आहे. केजरीवाल हे, सर्व काही बिघडलेले, भ्रष्ट आहे आणि मीच काय तो स्वच्छ आणि चांगला आहे, असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या मते समाजातला असा एकही घटक नाही, जो भ्रष्ट नाही. मग ते बडे उद्योगपती मुकेश अंबानी असोत की एखादा कारकून, नोकरशहा असो, की पत्रकार त्यांच्या मते ही सर्व मंडळी भ्रष्ट आहेत. त्यात त्यांना प्रसिद्धी देऊ न, मध्यम वर्गाचा मसिहा म्हणून नावारूपाला आणणारा मीडियाही समाविष्ट आहेच.
यात लोकमताचाही दोष आहेच. लोक जेव्हा एखाद्याच्या प्रेमात असतात, तेव्हा ते त्याच्या दोषांकडे सपशेल दुर्लक्ष करतात. त्यामुळे केजरीवाल जेव्हा राजकीय पद्धती बदलण्याची भाषा करतात, तेव्हा त्या भाषेच्या गांभीर्याकडे कुणीही लक्ष देत नाही. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सोडले तेव्हा ते संविधान पाळण्यास नकार देत आहेत, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. ते निवडणूक प्रचार करता यावा, यासाठी स्वत:ला सरकार चालविण्याच्या जबाबदारीतून मुक्त करून घेत आहेत, हे सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही आणि ज्यांच्या लक्षात येते ते याला कौशल्यपूर्ण राजकीय डावपेच मानतात आणि असे डावपेच खेळण्याचा त्यांना अधिकार आहे, असे सर्मथन करतात. लोकपाल ही एक चांगली सुरुवात आहे, असे अण्णा हजारे म्हणत असतानाही, केजरीवाल जनलोकपालच हवा असे म्हणत का अडून बसतात, याचा अर्थ शोधण्याचाही कुणी प्रयत्न करीत नाही. याचे कारण त्यांना केवळ राजकीय प्रक्रियेलाच सुरुंग लावायचा नसतो, तर त्यांना घटनात्मक प्रक्रियाच उलथून टाकायची असते. अशा गोष्टीतून काय चांगले निष्पन्न होणार आहे, याचा विचार न करता या अराजकाचे सर्मथन करणारे लोकही आहेत. आजवर झालेल्या लोकपाल आंदोलनाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आहे, याचा कुणी क्षणभर तरी विचार केला आहे का? त्यामुळे आधीच जागतिक मंदी असताना गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्‍वास कमी झाला आहे व हा देश व्यापार, व्यवहारासाठी सुरक्षित नाही, अशी त्यांची भावना झाली आहे. पण कदाचित केजरीवाल आणि मंडळीला तेच हवे असावे.
आपल्या बहुपक्षीय लोकशाहीत नवे पक्ष उदयाला येण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. दिल्लीतील लोकांनीही नव्या पक्षाच्या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवण्याची तयारी दर्शविली आहे. आम आदमीच्या या चेहर्‍यावर लोक विश्‍वास ठेवायला तयार आहेत. पण, या विश्‍वासाला सार्थ करून दाखविण्याची जबाबदारीही पार पाडली पाहिजे. अराजकातून ते अजिबात साध्य होणार नाही.
-विजय दर्डा
लोकमत पत्रसमूहाचे एडिटर इन चीफ

No comments:

Post a Comment