Monday, 24 February 2014

संपुआ सरकार व राष्ट्रीय लोकशाही आघाडी या दोघांचाही विदर्भ राज्याच्या निर्मितीला विरोध


संपुआ सरकार व  राष्ट्रीय लोकशाही आघाडी या दोघांचाही विदर्भ राज्याच्या निर्मितीला विरोध

तेलंगणाची निर्मिती होत असताना विदर्भातील काँग्रेसच्या आमदार व खासदारांनी कोणताही पाठपुरावा न केल्यामुळे विधानसभेत व लोकसभेत विदर्भ राज्याच्या निर्मितीचा प्रश्न साधा चर्चीलाही गेला नाही. संपुआ सरकारने विदर्भाच्या प्रश्नावर दाखविलेली उदासीनता व राज्याच्या मागणीला दाखविलेली केराची टोपली याला पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतृत्व जबाबदार आहे. मात्र तेलंगणाच्या निर्मितीनंतर भाजपने सत्तेवर आल्यास विदर्भ राज्याच्या निर्मितीची केलेली घोषणा त्याचवेळी शिवसेनेशी युती तोडण्याचे दिलेले संकेत हा सर्व प्रकार एक थोतांड असून केंद्रातील संपुआ सरकार व प्रमुख सत्तेचा दावा करणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी या दोघांचाही विदर्भ राज्याच्या निर्मितीला विरोध असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष व शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
ते म्हणाले की, विदर्भातील कृषी संकट, आदिवासींची उपासमार व कुपोषण, लाखो युवकांची बेरोजगारी, आरोग्य व उद्योगासाठी संसाधनांचा अभाव व पाठपुराव्याची कमी याला विदर्भाच्या लोकप्रतिनिधींचा उदासीनपणा जबाबदार आहे. केवळ निवडणुका आल्यावर विदर्भ राज्याच्या व विदर्भाच्या प्रश्नांचा बाजार करून मतदान मागणार्‍या या सर्व दांभिक राजकीय पक्षांना विदर्भाच्या मतदारांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर एक होऊन जागा दाखवावी, असे आवाहन स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीचे कार्यकर्ते व विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केले आहे. २0१0 मध्ये नागपूरच्या मिहानमध्ये १0 लाख लोकांना रोजगार मिळेल, असा दावा करणार्‍या विदर्भाच्या थोर नेत्यांना २0१४ मध्ये एकही रोजगार मिळालेला नाही. याची नैतिक जबाबदारी या नेत्यांनी घ्यावी व निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठय़ा प्रकल्पाचे भूमिपूजन करून लोकांना विदर्भाच्या विकासाचे गाजर दाखवू नये, असा सल्लासुद्धा तिवारी यांनी दिला आहे. 
जे नेते आज विदर्भाच्या नावावर राजकारण करायला समोर येत आहेत, त्या लोकांनी विदर्भाच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या होताना १0 लाखावर युवकांच्या रोजगारासाठी पुणे, मुंबई व बेंगळुरू येथे विस्थापन होत असताना लाखो आदिवासींचे कुपोषण होत असताना काय केले? असा सवाल उपस्थित करीत, या नेत्यांची मोठमोठी महाविद्यालये, साखर कारखाने, मोठमोठे कंत्राट व जनता कंगाल होत असताना त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली अफलातून वाढ हे सर्व विदर्भाच्या जनतेशी विश्‍वासघात केल्याचे प्रतीक असून येत्या निवडणुकीतसुद्धा हेच पोटभरू विदर्भवादी नेते विदर्भाच्या नावावर जनतेसमोर मत मागायला गेल्यास जनता त्यांना आपली जागा दाखविणार आहे. जर या नेत्यांना विदर्भाच्या जनतेच्या दु:खाची जाण असेल तर त्यांनी आपल्या अभियांत्रिकी, वैद्यकीय व आर्शमशाळा व सरकारी अनुदानित प्रकल्पामध्ये जमा केलेली संपत्ती आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना कुपोषण व उपासमारीला तोंड देत असलेल्या आदिवासींना द्यावी, नंतर विदर्भाच्या नावावर मत मागावे, असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment