Saturday, 24 August 2013

शेतकरी वाजविणार स्टेट बॅंकेसमोर 'डफडे'-लोकशाही वार्ता

शेतकरी वाजविणार स्टेट बॅंकेसमोर 'डफडे'-लोकशाही वार्ता 

 स्थानिक प्रतिनिधी/यवतमाळ
पीककर्ज मिळविण्यासाठी सतत बँकेच्या चकरा मारून त्रस्त झालेले शेतकरी आता सोमवारपासून आपापल्या विभागातील भारतीय स्टेट बँकेसमोर डफडे वाजवा आंदोलन करणार आहेत.
विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष व शेतकरी नेते किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. २६) घाटंजी तालुक्यातील पारवा येथील स्टेट बँकेसमोर डफडे वाजवून झोपी गेलेल्या बँक व जिल्हा प्रशासनाला जागे केले जाणार आहे. देशाच्या अथमंत्र्यापासून ते जिल्हाधिकार्‍यांपर्यंत सर्वांनी राष्ट्रीयीकृत बँकांना शेतकर्‍यांना पीककर्ज देण्याचे आदेश दिले आहेत. मोठय़ा आशेने शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज मागण्यासाठी जातात. दरवेळी निराशा पदरी पडत असल्याने बँकेचे उंबरठे झिजवून शेतकरी त्रस्त झाले आहेत. खरीपातील पीक कर्जाचे वितरण हे जूनमध्येच होणे अपेक्षित असताना ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत अनेक शेतकर्‍यांच्या हाती पीक कर्ज पडले नाही. त्यामुळे आता शेतकर्‍यांनीच बॅंकेचे व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन यांना जागे करण्यासाठी 'डफडे वाजवा' हे अभिनव आंदोलन यावर्षीही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ जनआंदोलन समितीचे त्या-त्या विभागातील कार्यकर्ते करणार असल्याची माहिती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दैनिक लोकशाही वार्ताला दिली.
शेतकरी नेते तुकाराम मोहुर्ले, दत्ता गटलेवार, युसुफखॉं पठाण यांनी शेतकर्‍यांना या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्टेट बॅंकेच्या मस्तवाल अधिकार्‍यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पात्र शेतकर्‍यांना अर्धा खरीप हंगाम उलटला तरी पिककर्जाचे वाटप केले नाही. आम्ही दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने पीक कर्जाचे वाटप करू, असे स्पष्ट उत्तर यवतमाळ जिल्ह्याचे स्टेट बँकेचे प्रभारी अतिरीक्त मुख्य व्यवस्थापकांनी किशोर तिवारी यांना दिले. याबाबत सरकारकडे दाद मागू शकता, आम्ही मात्र पीक कर्जाचे वाटप आमच्या र्मजीने आणि आमच्या वेळेवर करू असे स्पष्ट सांगितल्याने विदर्भ जनआंदोलन समितीने शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी डफडे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पांढरकवडा येथील स्टेट बँकेच्या शाखेत पिंपरी (रोड) येथील सरपंच भिसेन गेडाम मागील २ महिन्यांपासून चकरा मारत आहे. मात्र त्यांना पीककर्ज देण्यासाठी नियुक्त केलेला कर्मचारी आक्टोबरमध्ये पीक कर्ज वाटपाची तारीख देत आहे. तर कवठा येथील भूमन्ना चिट्टलवार यांना पाटणबोरी येथील स्टेट बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकांनी जूनपासून पाठपुरावा करून आजपर्यंत पीककर्ज दिले नाही. व्यवस्थापक शेताची पाहणी करून नंतरच पीक कर्ज मंजूर करणार असल्याचे सांगत आहे. शेतकर्‍यांची बोळवण करून त्यांना परत पाठविले जात आहे. नागेझरी येथील शेतकरी किशोर हेमके यांनी पारवा येथील स्टेट बँकेच्या शाखेत पीक कर्जासाठी प्रकरण दाखल केले. परंतु बँक व्यवस्थापकांनी नोव्हेंबरमध्ये पीककर्ज देण्यात येईल, असे सांगून त्यांना परत पाठविले आहे. खरीपाचा हंगामच नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने पीके निघाल्यावर कर्ज कशाला हवीत असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. जिल्हा प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहेत. त्यामुळे आता शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आपली लढाई आपणच लढण्याचा निर्धार केला आहे

बचतगटांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ

यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो बचतगटांना नवीन पीक कर्ज देण्यास भारतीय स्टेट बॅंकेने नकार दिल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली. ते म्हणाले की, झरीजामणी तालुक्यातील कारेगाव (गोंड) येथील बचतगटाच्या सदस्यांना स्टेट बॅंक शाखा पांढरकवडा येथील अधिकार्‍यांनी अपमानास्पद वागणूक देत हाकलून दिले. एकीकडे महाराष्ट्र सरकार पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहे तर दुसरीकडे स्टेट बँक कर्ज देण्यास नकार देत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कमजोर होत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

उपोषणानंतर महिला शेतकर्‍यास मिळाला न्याय
दारव्हा येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या व्यवस्थापकाने पेकर्डा येथील पुष्पा भोयर या महिला शेतकर्‍यास वाढीव पीककर्ज देण्यास नकार दिला होता. गेल्या वर्षी याच महिलेला अडीच लाख रुपये कर्ज दिल्यानंतर यंदा मात्र एक लाख रुपये मंजुर करून महिला शेतकर्‍याची थट्टा करण्यात आली. त्यामुळे व्यथित झालेल्या महिलेने बॅंकेसमोरच बेमुदत उपोषण केले. परंतु बॅंक व्यवस्थापनाला अखेर आपली चूक उमगल्यानंतर यंदा त्याच महिला शेतकर्‍यास साडेतीन लाख रुपये कर्ज मंजुर करण्यात आले आहे. अखेर उपोषण केल्यानंतरच त्या महिलेस न्याय दिला. असे असंख्य शेतकरी जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांचे उंबरठे झिजवित आहे.ॅ

No comments:

Post a Comment