Wednesday, 3 July 2013

आदिवासी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित-यवतमाळ जिल्ह्यातील कारेगावातील आर्शमशाळा १२ वर्षापासून बंदच- १५ जुलैपासून आमरण उपोषण

आदिवासी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित-यवतमाळ जिल्ह्यातील कारेगावातील आर्शमशाळा १२ वर्षापासून  बंदच- १५ जुलैपासून आमरण  उपोषण
 स्थानिक प्रतिनिधी /यवतमाळ
राज्यभरातील सर्वच शाळा आणि आर्शमशाळा २६ जून रोजी सुरू झाल्या. या दिवशी सरकारने प्रवेशोत्सवही साजरा केला. मात्र सीमावर्ती भागात असलेली पांढरकवडा तालुक्यातील कारेगाव (बंडल) येथील आदिवासी आर्शमशाळा अद्यापही सुरू झाली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही शाळा तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी १५   जुलैपासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीने नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आंध्रप्रदेश सीमेलगतच्या नक्षलग्रस्त आदिवासी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्दात हेतूने १९८२ मध्ये कारेगाव बंडल या गावात आदिवासी आर्शमशाळा सुरू करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय उदासीनता व आर्शमशाळेत कार्यरत शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे ही आर्शमशाळा नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे १९९६ मध्ये येथून ३0 किमी अंतरावर असलेल्या झटाळा येथे ही शाळा स्थलांतरित करण्यात आली होती. त्यामुळे या परिसरातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. या कारणामुळे आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. सरकारच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती उदासीन धोरणामुळे आजही ही शाळा सुसज्ज ईमारत असताना कारेगाव बु. येथे पूर्ववत सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या मागणीला घेऊन १५ जुलैपासून हजारो आदिवासी बांधव बेमुदत उपोषण करणार आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन ही आर्शमशाळा तातडीने सुरू करावी, अशी मागणी परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे.
 मागील महिन्यात ४ जून रोजी कारेगाव बंडल परिसरातील शेकडो आदिवासींनी सरकार जागरण आंदोलन करून शाळा सुरू करण्याची विनंती केली होती. विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी आदिवासी विभागाचे प्रभारी प्रधान सचिव प्रवीण परदेशी व आदिवासी आयुक्त सरकुंडे यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांनीही शाळा सर्व आर्शमशाळांसोबत याच वर्षी सुरू होईल असे आश्‍वासन दिले होते. मात्र आदिवासी विभागातील अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे शाळा सुरू होण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही. प्रकल्प कार्यालयात चौकशी केली असता आदिवासी विद्यार्थ्यांना गरज असेल तर त्यांनी झटाळा येथील आर्शम शाळेत जाऊन शिकावे, नाहीतर पोरांना ढोरं चारायला पाठवा असे उत्तर देण्यात आल्याची माहिती कारेगाव बंडल येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर अंधारे यांनी दिली. ही शाळा सुरू करण्यास राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. शिवाजीराव मोघे हेच उत्सूक नसल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला आहे

No comments:

Post a Comment