Friday, 26 July 2013

मुख्यमंत्री साहेब, आमच्या दारावर भेट द्या! शेतकरी विधवांचा आक्रोश…

मुख्यमंत्री साहेब, आमच्या दारावर भेट द्या! शेतकरी विधवांचा आक्रोश… 
ॅ जिल्हा प्रतिनिधी / यवतमाळ
अतवृष्टीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हय़ातील दोन शेतकर्‍यांनी अस्मानी संकटापुढे नतमस्तक होत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या दारापर्यंत यावे व त्यांची कैफिएत ऐकावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ना.चव्हाण या शनिवार व रविवारी विदर्भातील अतवृष्टीग्रस्त भागाच्या दौर्‍यावर येत आहे. यवतमाळ जिल्हयातील ठाणेगाव येथील आदिवासी शेतकरी अनिल मरापे यांच्या शेतात पुराचे पाणी घुसल्यामुळे शेत खरडून गेले. शेतातील संपूर्ण पिकच खरडून गेल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी व ३ मुली व १ मुलगा असून ते सध्या उपासमारीला तोंड देत आहेत. मात्र शेत खरडणे म्हणजे नैसर्गिक आपत्ती नाही, अशी भूमिका येथील उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घेतल्यामुळे त्यांना महाराष्ट्र सरकारची घोषित मदत मिळणार नाही. हे मात्र फारच धक्कादायक असून या भागात सर्वच शेतकर्‍यांची हजारो एकर जमीन खरडली आहे. व शेतकर्‍यांसोबत आता शेतमजुरांचीही उपासमार सुरू असल्याची माहिती राधाबाई मरापे यांनी दिली. 

मंगी येथील तरुण आदिवासी शेतकरी संतोष सिडाम यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचा प्रश्न संपूर्ण जगात गाजल्यावर सुद्धा सरकारी अधिकारी त्यांच्या दारावर गेले नाहीत. त्यांच्या पत्नी कवीता सिडाम फक्त २४ वर्षाच्या असून त्यांना एक १ वर्षाची तर दूसरी १ महिन्याची मुलगी आहे. २0 एकर जमिनीवर या वर्षी केलेली पेरणी बुडाल्यामुळे पतीने नैराश्याग्रस्त होवून आत्महत्या केल्याची माहिती कविताने दिली. तिचे सासरे रामकृष्ण सिडाम हे सहकारी संस्थेतून सचिव म्हणून सेवानवृत्त झाल्यावर त्यांना ४ वर्षापासून सरकारने पगार न दिल्यामुळे संपूर्ण कुटुंब उपासमारीला तोंड देत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यात सुरू असलेला अनागोंदी कारभार आपल्या डोळय़ांनी बघावा अशी आग्रही विनंती कविता सिडाम यांनी केली आहे. सरकारने २५हजार रुपये हेक्टरी मदत घोषित केलेली फक्त १0 लाख हेक्टरच्या सर्व शेतकर्‍यांना कोणतीही अट न घालता सरसकट द्यावी व ही मदत तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे

No comments:

Post a Comment