Friday, 10 May 2013

दुर्धर आजाराच्या काळ्याकुट्ट ढगांनी झाकोळलेला 'रवी' पैशांअभावी सृजनशील पत्रकाराचे उपचार थांबावेत? मदतीचे आवाहन

दुर्धर आजाराच्या काळ्याकुट्ट ढगांनी झाकोळलेला 'रवी'
पैशांअभावी सृजनशील पत्रकाराचे उपचार थांबावेत?
मदतीचे आवाहन
ॅ लोकशाही वार्ता / नागपूर
ज्याच्याजवळ व्यथा असते त्याच्याकडे कथा असते आणि प्रत्येकाकडेच एक व्यथा असते.. समाजाच्या व्यथांना आस्थेची ओंजळ देत त्या कथांना सुफळ संपूर्ण करणाराच आज त्याच्या व्यथांनी जायबंदी झाला आहे. आपल्याच व्यथांचा बाजार मांडत मानभावीपणे मदतीची याचना करणे त्याच्या स्वाभिमानाला रुचत नाही. पण पैशांअभावी एका सृजनशील पत्रकाराचे उपचार थांबणे समाजस्वास्थासाठी योग्य आहे का?
रवी गुळकरी.. नाव ऐकताच महाराष्ट्रात कुणीही म्हणेल- नागपुरातील एक सृजनशील व्यक्तित्व. हाडाचे पत्रकार. 
शहरातील विविध दैनिकांमध्ये पत्रकारिता केल्यानंतर हैद्राबाद येथील इ टीव्ही मराठीने त्यांना निमंत्रित केले व आपल्या वृत्तवाहिनीचे सहाय्यक वृत्त समन्वयकम्हणून जबाबदारी सोपविली. ती यशस्वीपणे पार पाडत असतानाच रवीची नागपुरात बदली झाली. इथे आपल्या वृत्तवाहिनीचे बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात असतानाच रवीला अचानक जीबीएस नावाच्या दुर्धर आजाराने गाठले. या आजारात माणूस कायमचा अपंग होतो. 'लाखोंमे एक' अशा रवीला व्याधीही जडली ती दोनेक लाखातून एखाद्यालाच होणारी. त्याच्या उपचारावर प्रचंड खर्च येतो. पण रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता कमी असते. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे वृत्तसंकलन करीत असतानाच त्या आजाराने रवीला अक्षरश: थिजवून टाकले. त्याच्या मानेच्या खालचा भाग एकदम बधीर झाला. शरीराची हालचाल बंद झाली. अंथरुणाखाली उतरणेही अशक्य झाले होते. काळ समोर दिसत होता. पण डॉक्टरांचे तातडीचे उपचार, स्वत:ची असामान्य इच्छाशक्ती आणि कुटुंबीय व इष्टमित्र यांचा भक्कम आधार या बळावर रवी गेले सात महिने जीबीएसच्या माध्यमातून मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉ. श्रीमती पौर्णिमा करंदीकर यांनीही रवीच्या इच्छाशक्तीचे कौतूक केले आहे. त्या सांगतात, ज्या अवस्थेत रुग्ण कमालीचा गलितगात्र झालेला असतो अशा अवस्थेत रवीला कसा आहेस विचारले असता रवी म्हणाला, 'एकदम छान आहे!' 
सात महिन्यांपूर्वी अंथरुणावर हालचाल करणेही ज्याला अशक्य होते तो रवी औषधोपचार आणि व्यायाम यामुळे आज घरात काठीच्या सहाय्याने जेमतेम चार सहा पावले टाकू शकतो. अत्यंत महागडा उपचार करण्यासाठी रवीचे कुटुंबीय, नातेवाईक आणि इष्टमित्र यांनी पैशाची कशी तरी जमवाजमव केली असली तरी ती कर्जरुपाने. आतापर्यंत त्याच्या उपचारांवर सुमारे सहा लाख रुपये खर्च झाला असला तरी त्याला ना मुख्यमंत्रिनिधीतून मदत मिळाली ना पंतप्रधान निधीतून. मुख्यमंत्र्यांनी मदत नाकारण्यासाठी कारण दिले रवीची महाराष्ट्राबाहेरील नोकरी आणि पंतप्रधानांच्या मदतीच्या कक्षेत दुर्धर असला तरी रवीचा आजार येत नव्हता.. 
दरम्यान, ई-टीव्ही मराठीकडून मिळणारा पगार बंद झाला. रवीच्या पत्नीवरही अर्धपगारी रजा घेण्याचा प्रसंग ओढवला. आता निधीच्या अभावी त्याला आपल्या उपचारातही कपात करावी लागत आहे. दररोज मसाज करण्याची गरज असताना आठवड्यातून एकच वेळ मसाज करावा लागतो आहे. सात महिन्यांच्या संघर्षात मोठा खर्च झाला असला तरी आणखी किमान सहा महिने घ्याव्या लागणार्‍या उपचारांवर सुमारे पाच लाख तरी खर्च लागणार आहे. सचोटीचे आणि स्वाभिमानाचे जीवन जगणार्‍या रवीसाठी हे एक आव्हानच आहे. मुख्यमंत्री वा पंतप्रधान निधीतून मदत न मिळाल्याची त्याला खंत नाही. त्यांच्या नियमात आपण बसत नसू तर मदतीची अपेक्षा का करावी, अशी त्याची भूमिका आहे. पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा, हीदेखील त्याची अपेक्षा नाही. त्याची लढाई तो लढतोच आहे. 
रवीच्या उपचारांवरील खर्च सरकारच्या नियमात बसत नाही. सरकारी नियम शब्दार्थांशी बांधील असतात. असतील, असोत.. पण, समाजाचे नियम तर भावार्थांनी पुण्यपावन झालेले असतात ना? पत्रकार, सृजनासाठी समाजच सरकार असतो. समाजाला हाक दिली तर नक्कीच 'ओ' येईल, या र्शद्धेने 'लोकशाही वार्ता'ने रवीच्या उर्वरित उपचारांसाठी निधी गोळा करण्याचे ठरविले आहे

No comments:

Post a Comment