Wednesday, 15 May 2013

कृषिमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या विदर्भभेटीदरम्यान तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या


स्थानिक प्रतिनिधी / यवतमाळ
भारताचे कृषिमंत्री शरद पवार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १४ मे रोजी भंडारा जिल्ह्यातील मुंडीपार येथे ५00 एकरामध्ये भारत सरकारच्या भेलच्या उर्जा प्रकल्पाचे उद््घाटन करत होते. त्याच वेळी यवतमाळ जिल्ह्यातील हिरापूर येथील शेतकरी गजानन गोवर्धन, अकोला जिल्ह्यातील मांजरी येथील शेतकरी देवेंद्र खंडारे व बुलढाणा जिल्ह्यातील तालखेड येथील शेतकरी दशरथ खाकरे यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली.
तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा विदर्भातील कृषी संकट गांभिर्याने समोर आले असून संपूर्ण विदर्भातील बँकांनी पतपुरवठा रोखून धरला आहे. कर्जबाजारी शेतकर्यांना बियाणे व खत घेण्यासही पैसे नसल्यामुळे व त्याचवेळी खाजगी सावकार व बॅंकानी सक्तीची वसुली सुरू केल्यामुळे या आत्महत्या होत असल्याची माहिती विदर्भ जन आंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली.संपूर्ण विदर्भात शेतकर्‍यांना यावर्षी कापूस व सोयाबीन या पिकांवर प्रचंड खर्च झाला असून बाजारात कापसाला व सोयाबीनला तसेच तुरीला भाव न मिळाल्यामुळे सर्व शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या वर्षी आत्महत्याग्रस्त अमरावती विभागात सरकारने बँकांमार्फत ५ हजार २00 कोटींचे पीक कर्ज वाटपाचे लक्ष निर्धारित केले असून राष्ट्रीयीकृत बँकाना ३ हजार कोटी तर २२00 कोटी सहकारी बँकाना वाटप करायचे आहे. मात्र सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या असून राष्ट्रीयकृत बँकानी मागील वर्षाची पीक कर्ज वसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यामुळे शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज वाटप करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत सरकारने सर्व थकबाकीदार शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज देण्यासाठी निर्णय घ्यावा व शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवाव्या, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
पश्‍चिम विदर्भात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड संकट समोर येत असून संपूर्ण क्षेत्रात चारा सुद्धा उपलब्ध नाही. ग्रामीण भागात रोजगार देणारी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना राजकीय भ्रष्टाचाराचे कुरण केल्यामुळे अक्षरक्ष: बंद पडली आहे. कोणताही अधिकारी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम करण्यास तयार नाही तर शेतकर्‍यांच्या पीक पद्धती, बियाण्यांची उपलब्धता, पीक कर्जाचे नव्याने वाटप तसेच ग्रामीण भागातील आरोग्य व अन्न सुरक्षा या सारख्या मूलभूत प्रश्नावर सरकारशी पाठपुरावा करण्यास कोणतीही राजकीय पक्ष तयार नाही व आघाडी सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 

No comments:

Post a Comment