Sunday, 5 August 2012

अण्णांचा राजकीय पर्याय भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी -विदर्भ जनआंदोलन समितीकडून स्वागत

अण्णांचा राजकीय पर्याय भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी विदर्भ जनआंदोलन समितीकडून स्वागत 
तभा वृत्तसेवा- यवतमाळ, ५ ऑगस्ट
सध्या प्रशासनात व राजकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, अण्णा हजारे यांनी भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राजकीय विकल्पाची संकल्पना मांडली. त्याचे विदर्भ जनआंदोलन स्वागत केले असून, समाजातील संवेदनशील व सुजाण जनता आणि युवा पिढीने या राजकीय चळवळीत सामील व्हावे, असे कळकळीचे आवाहन विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले आहे. विदर्भातील शेतकरयांच्या आत्महत्या, आदिवासींचे कुपोषण, औद्योगिक क्षेत्रात असलेला मागासलेपणा याला राजकीय व प्रशासनातील भ्रष्टाचारच जबाबदार असून, सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये सत्तेमध्ये जाऊन संपत्ती जमा करण्याचे एकमेव तंत्र सुरू असून, सामान्य जनता मात्र यात होरपळून जात आहे. शाळेत मास्तर नाही, दवाखान्यात डॉक्टर व औषध नाही, सुशिक्षित युवकांना रोजगार नाही, शेतकरयांच्या घामाला दाम नाही व ६६ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही देश अन्न, वस्त्र व निवारा यांसारख्या मूलभूत सुविधा देऊ शकला नाही. याला भ्रष्ट राजकीय व्यवस्थाच जबाबदार आहे, याला समितीने दुजोरा दिला आहे. १९७७ मध्ये जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची हाक दिली व देशातील युवक त्यांच्या हाकेवर राजकीय चळवळीत आला. मात्र जयप्रकाश नारायण यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता ३० वर्षानंतर पहिल्यांदाच भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला पर्याय देण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न होत आहे. अशा ऐतिहासिक प्रसंगी सर्वांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा व पोटभरू धोरण बाजूला ठेवून या राजकीय क्रांतीच्या प्रयत्नाला यश द्यावे, अशी विनंती किशोर तिवारी यांनी विदर्भाच्या जनतेला केली आहे. 
सध्या अण्णा हजारे व स्वामी रामदेव यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध संपूर्ण देशात वातावरण निर्माण केले आहे. परंतु त्यांच्या आंदोलनात अन्न, वस्त्र, निवारा व दलित, आदिवासी, अल्पसंख्यक यांच्या समस्यांना प्रामुख्याने जागा दिसत नाही. शेतकरयांच्या व ग्रामीण जनतेच्या आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या समस्येवर त्यांच्यासोबत दलित, आदिवासी व ग्रामीण जनता दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये राजकीय पर्याय देण्याची संकल्पना मृगजळच ठरेल. याकरिता स्वामी रामदेव व अण्णा हजारे यांनी गरिबांसाठी व सामाजिक न्यायाच्या लढाईत भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढत असलेल्या प्रामाणिक कार्यकत्र्यांना सोबत घ्यावे, अशी अपेक्षाही किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे

No comments:

Post a Comment