Saturday, 2 June 2012

वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये 'अर्थ'पूर्ण व्यवहार-लोकमत

वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये 'अर्थ'पूर्ण व्यवहार-लोकमतमंत्रालयात असा ठरला आरएफओंच्या बदलीचा दर
■ वरूड - १५लाख
■ परतवाडा - १0लाख
■ अमरावती - ११लाख
■ अकोला - १२लाख
■ बुलडाणा - १२लाख
■ खामगाव - १३लाख
■ कारंजा - १0लाख
■ अकोट - ८ लाख
■ मोर्शी - ६ लाख
■ अंजनगाव सुर्जी - ५लाख
■ जारिदा - ३ लाख
■ जळगाव (जामोद) - ३ लाख

गणेश वासनिक।दि. १ (अमरावती)वनमंत्रालयातून नुकत्याच झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात 'अर्थ'पूर्ण व्यवहार झाला आहे.ही बाब वन विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रविणसिंह परदेशी यांच्या लक्षात येताच त्यांनी काही अधिकार्‍यांना साईड ब्रॅन्चमध्ये वळती केले. मात्र मलिदा रेंजकरिता लाखोची बोली करून काही वनपरिक्षेत्र अधिकारी बदली करण्यात यशस्वी झाले आहेत.
महसूल विभागातील तहसीलदार आणि पोलीस विभागातील ठाणेदारांच्या बदल्यांसाठी 'डिलिंग' होत असल्याचे ऐकीवात आहे. पण काही वर्षांपासून वन विभागातील अधिकार्‍यांनी पैशाच्या जोरावर मोक्याच्या जागा काबीज करण्यासाठी महसूल व पोलीस विभागालाही मागे टाकल्याचे चित्र आहे.बदल्यांचा मोसम सुरू झाला की, वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचे मलिदा देणार्‍या रेंज मिळविण्यासाठी मंत्रालयाच्या पायर्‍या चढण्याला सुरुवात होते.यावर्षीसुद्धा मोक्याच्या व 'अर्थ'पूर्णजागांसाठी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली होती. एकमेकांवर कुरघोडी करीत हव्या त्या जागेसाठी लाखोंची बोली लावण्यात आली आहे.वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्या थेट वनमंत्रालयातून करण्यात आल्या.प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत अनेकांनी लाखो रुपयांच्या पाठबळाच्या आधारे व राजकीय लागेबांधे लावून आपल्या मनासारख्या रेंज मिळविल्याचे दिसून येते.
अमरावती वनपरिक्षेत्रातील यवतमाळ, अमरावती प्रादेशिक वनविभाग, बुलडाणा, अकोला वनविभागातील महत्त्वाच्या रेंज काबीज करण्यासाठी दिग्गज वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी साम, दाम, दंड, भेदचा वापर केल्याचे बोलले जाते. मंत्रालयातील बाबू व स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी धरून बदल्यांमध्ये 'अर्थ' पूर्ण व्यवहार झाल्याची माहिती आहे.दुसरीकडे प्रादेशिक वन विभागातील रेंज वगळता व्याघ्र प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभागात जाण्यास कुठल्याही वनपरिक्षेत्र अधिकार्‍याला रस नाही.हे चित्र वनविभागाचे आहे.
मंत्रालयात तयार झालेल्या बदली यादीमध्ये बरेच काही दडले आहे, याची कुणकुण वन विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रविणसिंह परदेशी यांना लागताच त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या नियुक्तीचे स्थळ बदलवून जबर धक्का दिला.या प्रकाराने वनपरिक्षेत्र अधिकारी चक्रावून गेले आणि लाखोंची बोली फिस्कटली, अशी चर्चा हल्ली वनविभागात जोरात सुरू आहे.
अमरावती जिल्ह्यातील एका वनपरिक्षेत्र अधिकार्‍यानी खामगाव रेंजसाठी मंत्रालयात १0लाख रुपये जमा केले.मात्र डॉ.परदेशी यांच्या हस्तक्षेपामुळे त्या अधिकार्‍याला वन विभागाऐवजी सामाजिक वनीकरण विभाग देण्यात आला. अकोला जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकार्‍याने 'अर्थ' पूर्ण व्यवहारासोबतच यवतमाळच्या एका राज्यस्तरावरील नेत्यांचा बदलीसाठी दबाव आणला असता प्रधान सचिवांनी त्या अधिकार्‍याला वरूड येथे नियुक्ती दिली. चांदूर (रेल्वे) रोहयोचे घुमारे व चिखलदरा येथील जवंजाळ यांची सहा महिन्याच्या आतमध्येच बदली झाली आहे.मोक्याच्या रेंज मिळविण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी का म्हणून जीवाचे रान करतात, हा विषय संशोधनाचा ठरू लागला आहे.

No comments:

Post a Comment