Monday, 28 May 2012

कोरडवाहू शेतकरयांनी विदेशी बीटी बियाणे लावू नये-विदर्भ जन आन्दोलन समितीचे आवाहन

कोरडवाहू शेतकरयांनी विदेशी बीटी बियाणे लावू नये-विदर्भ जन आन्दोलन समितीचे आवाहन 
तभा वृत्तसेवा यवतमाळ, २८ मे 2012

 
 बहुराष्ट्रीय कंपन्यांना पोसणारी व गिरणी मालकांचे हितरक्षण करणारया कापसाच्या बीटी बियाण्यांची शेती सोडावी. अनियंत्रित रासायनिक खतांचा वापर न करता कमी पाण्याच्या, कोरडवाहू क्षेत्रात टिकणारया कापसाच्या वाणाचा वापर शेतकरयांनी करावा, असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे. विदर्भातील कोरडवाहू शेतकरयांनी परंपरागत पद्धतीने कीटकनाशकांचा व कापसासोबत ज्वारी, तूर, भुईमूग, मूगयासारखी पिके शेतकरयांनी घ्यावीत, असे आवाहन करीत सोमवारपासून विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात गावागावांत जाऊन शेतकरी संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे.
भारताचे कृषिमंत्री शरद पवार यांनी विदर्भाचे कोरडवाहू शेतकरी सिचनावर आधारित बीटी कापसाचे पीक घेऊन प्रत्येक वर्षी कमीतकमी दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान करीत आहेत, असे लोकसभेत म्हटले आहे.
लोकसभेत सांसदीय समितीने पश्चिम विदर्भातील शेतकरयांच्या आत्महत्या व बीटी बियाण्यांचा वाढलेला पेरा याचा सरळ संबंध जोडून सरकारला कोरडवाहू क्षेत्रात चुकीचे बियाणे व पीक पेरण्याची परवानगी दिल्याबद्दल दोषी धरले आहे. भारतीय कृषी संस्थेने जगाचा दौरा करून भारताच्या कोरडवाहू क्षेत्रात अती पाण्याचे बीटी बियाणे लावण्यास बंदी टाकावी, अशी शिफारस केली आहे. असे असताना विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरयांनी मागील पाच वर्षांचा लेखाजोखा घेऊन यावर्षी कापसाचा पेरा करण्यापूर्वी आमच्या विनंतीचा विचार करावा, असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे. 
 भारत सरकारला कोरडवाहू शेतीमध्ये शेतकरयांच्या फायद्याच तंत्रज्ञान तसेच पीक घेण्यासाठी धोरण बनवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 
लगतच्या आंध्रप्रदेशमध्ये कीटकनाशक व रासायनिक शेती न करता ७०० खेड्यांत चार लाखांवर शेतकरयांनी आत्महत्येचा मार्ग सोडून कर्जातून मुक्ती मिळविली आहे. पश्चिम विदर्भालगतच्या आंध्रप्रदेशमध्ये कोरडवाहू शेतकरी आपले जीवन व पर्यावरण वाचवण्यासाठी परंपरागत शेतीकडे वळू शकतात, तर विदर्भाचे कोरडवाहू शेतकरी का वळणार नाहीत, या प्रेरणेने विदर्भ जनआंदोलन समितीने हे जनजागृती अभियान सुरू केले आहे. 
  सिचनावर आधारित अती पावसाचे पीक घेणे शेतकरयांना अतिशय महागडे झाले असून,शेतकरयांना हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, बियाणे निर्माण करणारया विदेशी कंपन्या आपल्या बियाण्यांचा व कीटकनाशकांचा आणि सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे आपल्या तयार केलेल्या रासायनिक खतांचा वापर व्हावा यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहिरात करीत आहेत. या कटामध्ये सर्व कृषी विद्यापीठ व कृषी विभाग सहभागी असून, शेतकरयांना दुसरया हरित क्रांतीचे गांजर दाखवून कर्जाच्या खाईत ढकलत आहे. कोरडवाहू क्षेत्रात भरड धान्याचे उत्पादन करणारया शेतकरयाला प्रती एकर १० हजार रुपये अनुदान देणे, कृषी खाते व कृषी विद्यापीठाने विदेशी कंपन्यांची दलाली सोडून आंध्र सरकारने जसा परंपरागत शेतीसाठी पुढाकार घेतला त्या प्रमाणे पुढाकार घेऊन शेतकरयांना आत्महत्येपासून वाचवावे, अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे. 
किशोर तिवारी यांचे आवाहन व त्यांनी केलेली विनंती याचा प्रचार विदर्भ जनआंदोलन समितीचे सदस्य मोहन जाधव, सुरेश बोलेनवर, मोरेश्वर वातिले, अंकित नैताम, भीमराव नैताम, नितीन कांबळे, संतोष नैताम हे गावोगाव फिरून करीत आहेत.

No comments:

Post a Comment