Friday, 25 May 2012

कोरडवाहू शेतकर्‍यांनी अति पावसाचे पीक टाळावे-विदर्भ जनांदोलन समितीची जनजागरण मोहिम

कोरडवाहू शेतकर्‍यांनी अति पावसाचे पीक टाळावे-विदर्भ जनांदोलन समितीची बी.टी. बियाने विरुद्ध    जनजागरण मोहिम 

लोकशाही वार्ता/ २५ मे

पांढरकवडा : लगतच्या आंध्रप्रदेशातील ७00 खेड्यांमध्ये ४ लाखांवर शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग सोडून किटकनाशक व रासायनिक शेती न करता कर्जबारीपणा पासून मुक्ती मिळविली आहे. जर पश्‍चिम विदर्भाच्या लगतच्या आंध्रप्रदेशमध्ये कोरडवाहू शेतकरी आपले जीवन व पर्यावरण वाचविण्यासाठी परंपरागत शेतीकडे वळू शकतात तर विदर्भाचे कोरडवाहू शेतकरी का वळणार नाही. या प्रेरणेने प्रेरीत होऊन विदर्भ जनआंदोलन समितीने विदर्भाच्या कोरडवाहू आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना पोसनारी व गिरणी मालकांचे हित रक्षण करणार्‍या सरकारचे गुलाम करणारी कापसाची बि. टी. बियाण्यांची शेती सोडून पंरपरागत पद्धतीने किटकनाशकाचा व अनियंत्रीत रासायनिक खतांचा वापर न करता कमी पाण्याचे कोरडवाहू क्षेत्रात टिकणार्‍या कापसाच्या वाणासोबत इतर ज्वारी, तुरी, भुईमुंग, मुंग यासारखे देशाला व शेतकर्‍यांना लागणारे पीक घेण्याचे आवाहन केले. यासाठी पुढील आठवड्यात २८ मे पासून गावागावात जाऊन शेतकरी संपर्क अभियान सुरू करणार असल्याची माहिती समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली.
विदर्भ जनआंदोलन समितीचे शेतकरी कार्यकर्ते मोहन जाधव, सुरेश बोलेनवार, मोरेश्‍वर वातिले, अंकीत नैताम, भीमराव नैताम, नितिन कांबळे, नंदू जयस्वाल, राजू राठोड, संतोष नैताम आदि कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. कोरडवाहू शेतीमध्ये सिंचनावर आधारीत अति पावसाचे पीक शेतक र्‍यांना घेणे अतिशय महागडे झाले असून सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे शेतकर्‍यांना हजारो कोटींचा तोटा होत आहे. मात्र, बियाणे निर्माण करणार्‍या विदेशी कंपन्या आपल्या बियाण्यांचा, किटकनाशकांचा व आपल्या तयार केलेल्या रासायनिक खतांचा वापर व्हावा यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहीरात करीत आहेत. या कटामध्ये सर्व कृषी विद्यापीठ व कृषी विभाग शामील असून शेतकर्‍यांना दुसर्‍या हरीतक्रांतीचे गाजर दाखवून कर्जाच्या विहिरीत ढकलल्या जात आहे. भारताच्या सवरेच्य सांसदीय समितीने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या व बि. टी. बियाण्यांचा वाढलेला पेरा याचा सरळ संबंध जोडून सरकारला कोरडवाहू क्षेत्रात चुकीचे बियाणे व पीक पेरण्याची परवानगी दिल्याबद्दल दोषी धरले आहे, तर भारतीय कृषी संशोधन संस्थेने जगाचा दौरा करून भारताच्या कोरडवाहू क्षेत्रात अती पाण्याचे बि.टी. बियाणे लावण्यास बंदी टाकावी अशी शिफारस केली आहे. त्यामुळे विदर्भाच्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी मागील ५ वर्षांचा लेखाजोखा घेऊन कापसाचा पेरा करण्यापूर्वी आमच्या विनंतीचा विचार करावा असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे.
जल सिंचनाच्या योजनांवर विदर्भात ३0 हजार कोटी रुपये खर्च करूनही विदर्भाचे सिंचन क्षेत्र फक्त ३ टक्क्याने वाढले आहे. सारे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले तरी जेमतेम २0 टक्के क्षेत्रच सिंचनाखाली येणार आहे. म्हणून कोरडवाहू शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी भरड धान्याला सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये स्थान देणे, कोरडवाहू क्षेत्रात भरड धान्याचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना प्रति एकर १0 हजार रुपये अनुदान देणे, कृषी खाते व कृषी विद्यापिठाने विदेशी कंपन्यांची दलाली सोडून आंध्र सरकारने जसा परंपरागत शेतीसाठी पुढकार घेतला त्या प्रमाणे पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना आत्महत्येपासून वाचवावे अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे.
आमचे कार्यकर्ते गावा गावात जाऊन प्रगतिशील शेतकरी सुभाष पाळेकर यांची नैसर्गिक शेती, पर्यावरणास अनुकूल कृषी संशोधन केंद्र यांची किटकनाशकाचा वापर न करता आंध्रप्रदेशातील ७00 खेड्यात होत असलेल्या शेतीची चित्रफित दाखवितात अशी माहिती समितीचे सचिव मोहन जाधव यांनी दिली.
===========================================================

No comments:

Post a Comment