Monday, 7 May 2012

सरकारने कापूस निर्यातीवर पुन्हा लादल्या जाचक अटी

सरकारने कापूस निर्यातीवर पुन्हा लादल्या जाचक अटी

यवतमाळ : प्रतिनिधी
पांढरकवडा: दि.३0 एप्रिलला केंद्र सरकारने कापसाच्या निर्यातीवरील सर्व अटी दूर करून निर्यात खुल्या परवान्याअंतर्गत सुरु केल्याची घोषणा करीत सरकार कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठिशी आहे, असा विश्‍वास निर्माण केला. सरकारच्या घोषणेनंतर संपूर्ण भारतात कापसाचा भाव क्विंटल मागे ५00 ते ७00 रुपयांपर्यंत वाढला. ४ मे रोजी यावेळी भारताचे कृषीमंत्री शरद पवार या वर्षी कापसाचे विक्रमी ३५0 लाख गाठीचे उत्पन्न होत आहे, अशी घोषणा करीत होते. त्याच वेळी वाणिज्य मंत्रालयातील अधिकारी गिरणी मालकांच्या हिताकरिता कापूस निर्यातीवर नवीन जाचक अटी लावत होते. वाणिज्य मंत्रालयाने आपल्या नव्या आदेशा प्रमाणे कोणताही निर्यातदार जास्तीत जास्त १0 हजार गाठी निर्यात करू शकतात. या नंतर नवीन परवान्यासाठी १५00 - १५00 गाठीचे अर्ज करावे लागतील व १६ मार्च २0१२ ला लादलेल्या अटी नवीन निर्यातीसाठी लागू होतील असे या आदेशात म्हटले आहे. सध्या भारतात कृषी मंत्र्यांच्या आकडेवारी नुसारच १५0 लाख गाठी निर्यातीसाठी उपलब्ध असून मात्र या नवीन आदेशाने प्रमुख निर्यातदार कोटाराजमुळे जेमतेम जास्तीत जास्त १ ते २ लाख गाठीची निर्यात करु शकतील अशी वस्तुस्थिती आहे. वाणिज्य मंत्रालयाचा ४ मे चा आदेश नवीन कापसावर निर्यातबंदी असून सरकारने पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकर्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असून या आदेशामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतील अशी भीती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जगात कापसाचा भाव सरासरी ५ हजारांच्यावर असतांना भारताच्या शेतकर्‍यांना निर्यातबंदीच्या जाचक अटीमुळे जेमतेम सरासरी ३५00 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. भारताच्या कापूस गिरणी मालकांना स्वस्त कापूस मिळावा यासाठी सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांनी व अधिकार्‍यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला वारंवार चुकीची माहिती देऊन कापसाचे भाव भारतात पाडले मात्र केंद्रीय मंत्री मंडळाकडून तर ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून सतत विरोध होत असतांना पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घातल्यानंतर ३0एप्रिलला सरकारने निर्यात बंदी उचलली होती मात्र फक्त ३ दिवसात वाणिज्यमंत्री व वाणिज्य सचिव यांनी मोठी रक्कम घेऊन ४ मेला कोटाराज निर्माण करणारी व नवीन जाचक अटी लावणारा आदेश जारी केला. सरकारने ३ मार्चनंतर वाणिज्य मंत्रालयाने काढलेले सर्व आदेश रद्द करावे व कापसावरील निर्यातबंदी विनाशर्त उठवावी, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment