Tuesday, 17 April 2012

टिपेश्वर अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव अमान्य -कोलाम चावडीत उद्या आदिवासी पंचायत-

टिपेश्वर अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव अमान्य
नागपूर / प्रतिनिधी

टिपेश्वर अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव आदिवासींनी अमान्य केला असून त्यासंदर्भात टिपेश्वर येथे येत्या १८ एप्रिलला आदिवासी पंचायत आयोजित करण्यात आली आहे. टिपेश्वर अभयारण्यातील टिपेश्वर, पिटापुगंरी व मारेगाव या गावाच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचली असली तरीही टिपेश्वर येथे गेल्या अनेक पिढय़ांपासून शेती करून राहणाऱ्या कोलाम  आदिवासींना हा पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्य नाही. या पुनर्वसनामुळे भूमिहीन होऊन जीवन उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे या सर्व आदिवासींनी पुनर्वसन प्रस्तावातील अमान्य अटी व जमिनीच्या बदल्या जमीन आणि अभयारण्यातील विस्थापित होणाऱ्या आदिवासींच्या मुलांना वनखात्यात नोकरी, असे अनेक बदल सरकारपुढे मांडले आहेत. याची प्रस्ताव रूपाने मांडणी करण्यासाठी येत्या १८ एप्रिलला टिपेश्वर येथील कोलाम चावडीत आदिवासी पंचायत आयोजित करण्यात आली आहे. या पंचायतीत विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, माजी जिल्हा परिषद सदस्य व कोलाम नेते तुकाराम मेश्राम, पांढरकवडा येथील नगरसेवक अंकीत नैताम यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आदिवासी पंचायतीत पिटापुगरी, दर्यापूरसह टिपेश्वरमधील शेतमजूर व शेतकरी त्यांच्या अडचणी मांडतील, अशी माहिती टिपेश्वर आदिवासी वाचवा समितीचे लक्ष्मण येडमे, कवडू टेकाम, अजाब कोवे, विठ्ठल धुर्वे आदिंनी दिली.
टिपेश्वर येथील ग्रामसभेत आदिवासींनी टिपेश्वरातील त्यांची वस्ती सोडण्यास संमती दिली होती, मात्र त्यांनी याच प्रस्तावात जमिनीच्या बदल्यात जमीन, गावाच्या बदल्यात पूर्ण वस्तीचे निर्माण व विस्थापित होणाऱ्या आदिवासी कुटुंबातील युवकांना वनरक्षक किंवा वनकामगार म्हणून नोकरी द्यावी, अशा मागण्या पुढे रेटल्या होत्या. त्या सरकारने अमान्य केल्यामुळे आदिवासींमधील असंतोष वाढला. या सर्व प्रकरणात तोडगा निघावा, यासाठी येत्या १८ एप्रिलला आदिवासी पंचायत आयोजित करण्यात आली आहे.
गेल्या दशकभरात हे अभयारण्य जंगलतोडीचे केंद्र झाले आहे. यावर्षी पाणी व चारा नसल्यामुळे अभयारण्यातील पट्टेदार वाघ, तसेच जनावरे अभयारण्याबाहेर पडत आहेत. यामुळे मानव व वन्यप्राणी संघर्ष निर्माण झाला आहे. यासंदर्भात किशोर तिवारी यांनी वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेसी व जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा केली. आलेल्या निधीचा सदुपयोग व्हावा व समस्या त्वरित सुटावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे किशोर वितारी यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.   

No comments:

Post a Comment