Monday, 9 January 2012

कॉंग्रेसी सरकारला येत्या निवडणुकीत खुला विरोध - किशोर तिवारी


कॉंग्रेसी सरकारला येत्या निवडणुकीत खुला विरोध

स्रोत: TarunBharat - Marathi      तारीख: 1/9/2012 8:47:15 PM
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ९ जानेवारी
आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे मागील हंगामात शेतकर्‍यांना आपला कापूस निर्यातबंदीच्या फटक्यामुळे मातीमोल किंमतीत विकावा लागला. यावर्षी सरकारचे सत्तारुढ दोन्ही कॉंग्रेसी पक्ष कापसाचा हमीभाव ६ हजार रुपये करा अशी ओरड ऑगस्ट महिन्यापासून करीत असतानाही नाकर्त्या कॉंग्रेसच्याच आघाडी सरकारने कापूस, धान व सोयाबीनच्या हमीभाव वाढीच्या प्रश्‍नाला पाने पुसली. त्यामुळे विदर्भाचा शेतकरी पूर्णपणे कंगाल व कर्जबाजारी झाला असून या कॉंग्रेसी आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा खुला विरोध विदर्भाचे शेतकरी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये करणार असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यासाठी शेतकरी सक्षम विरोधी पक्षाला मतदान करतील आणि विदर्भ जनआंदोलन समिती आघाडी सरकारमधील पक्षांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी आपला खुला पाठिंबा देतील, अशी घोषणा शेतकरी नेेते किशोर तिवारी यांनी केली.
घाटंजी येथील सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी हा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रातील या कॉंग्रेसी सरकारला सत्तेची मस्ती आली असून पैसा व दारू यांचा महापूर वाहून शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा डोंगर रचूनही निवडून येतो असा दंभ निर्माण झाला आहे. या कॉंग्रेसी आघाडी सरकारच्या पक्षांनी शेतकर्‍यांचे संसार उद्ध्वस्त केल्यानंतर त्यांचे थोतांड जगासमोर आणणे आणि शेतकरी व शेतमजुरांना वास्तविकतेची जाण देणे, यासाठी शेतकरी नेेते शेतकर्‍यांच्या दारापर्यंत जाऊन आघाडी सरकारला धडा शिकवणार, असा गंभीर इशारा किशोर तिवारी यांनी यावेळी दिला.
जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत आरोग्य, शिक्षण व महिला बालविकाससह ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण भागातील आर्थिक विकास व सर्व क्षेत्रातील विकासासाठी येणारा कोट्यवधींचा निधी राजरोसपणे लुटल्या जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात आघाडी सरकारने घटकपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व इंदिरा कॉंग्रेस निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढतात आणि निवडणुकीनंतर मात्र एक होऊन सत्तेची मजा लुटतात याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
अनेक राजकीय नेत्यांचा जिल्हा परिषद सदस्य होणे हा पोट भरण्याचा धंदा असून अशा सर्व पोटभरू नेत्यांनीच विदर्भाचा संपूर्ण सत्यानाश केला आहे, असा सणसणीत आरोपही तिवारी यांनी केला आहे.
आता जनतेला हे सत्य माहिती व्हावे यासाठी आपण संपूर्ण जिल्हाभर या कॉंग्रेसी आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण आणि जिल्हा परिषदेमधील भ्रष्टाचाराच्या पापांची लक्तरे गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली

No comments:

Post a Comment