Saturday, 17 December 2011

शासनाने शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव न दिल्यास . . .तर नक्षलवाद्यांना मदत करू !

शासनाने शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव न दिल्यास . . .तर नक्षलवाद्यांना मदत करू !

लोकशाही वार्ता/१७ डिसेंबर

यवतमाळ : महिन्याभरापासून हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. मात्र शासनाने विदर्भातील शेतकर्‍यांप्रती कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. केवळ पॅकेजच्या नावाखाली शेतकर्‍यांना तोकडी मदत जाहीर केली आहे. कृषी मुल्य आयोगाने शेतकर्‍यांची चेष्टा केली आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव न दिल्यास तसेच हेक्टरी मदत जाहीर न केल्यास यापुढे नक्षलवाद्यांना मदत करू, असा निर्वाणीचा इशारा बेलोरा येथील शेतकरी कृती समितीच्या बैठकीत ५ गावातील शेतकर्‍यांनी शासनाला दिला आहे.
आर्णी तालुक्यातील बेलोरा येथे ब्राम्हणवाडा, साकुर, मंगरुळ, बोरी गोसावी व बेलोरा या पाच गावातील शेतकर्यांनी एकत्र येऊन कृती समितीची स्थापना केली. आज या कृती समितीची सभा घेण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून विदर्भातील शेतकर्‍यांचे कापूस प्रश्नावर 'रण' माजले आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरूआहे. मात्र या अधिवेशनात शासनाने शेतकर्‍यांप्रती कोणतीही भूमिका घेतली नाही केवळ २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून शेतकर्‍याची दिशाभूल आहे, असा आरोपही काही शेतकर्‍यांनी आजच्या सभेत केला. कृषी मुल्य आयोगानेही जाहीर केलेल्या हमीभावाबाबत फेरविचार करूनच निर्णय घ्यावा, शासनाने शेतकर्‍यांना नुकसान झालेल्यांना मोबदला द्यावा, अश्या अनेक मागण्या आजच्या सभेत ठेवल्या. शासनाने या मागण्या मान्य न केल्यास तसेच हमीभाव जाहीर न केल्यास शासनाने जी मदत जाहीर केली आहे ती मदत घेवूनच य पुढे नक्षलवादी संघटनांना मदत करू, असा इशारा शेतकरी कृती समितीने दिला आहे. शासन केवळ मदत दिल्याचे जाहीर करते, पण ही मदज तोकडी असून त्यांचा शेतकर्‍यांना फायदा होत नाही. त्यामुळे यापुढे कृषी मूल्य आयोगाने हमीभावाचा फेरविचार न केल्यास व शासनानेही शेतकर्‍यांप्रती उदारता न दाखविल्यास यापुढे नक्षली संघटनांना मदत करू, असा निर्वाणीचा इशारा ब्राम्हणवाडा, साकुर, मंगरुळ, बेलोरा, बोरी गोसावी येथील शेतकर्‍यांनी शासनाला दिला आहे. या सभेला पाचही गावातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
==========================================

No comments:

Post a Comment