Monday, 28 November 2011

कापसाला मदत देण्यासाठी आचारसंहितेचा अडसर-किशोर तिवारींची निवडणूक आयोगाकडे धाव

कापसाला मदत देण्यासाठी आचारसंहितेचा अडसर

किशोर तिवारींची निवडणूक आयोगाकडे धाव
नगर वार्ताहर
स्रोत: TarunBharat - Marathi      तारीख: 11/28/2011 10:57:33 PM नागपूर, २८ नोव्हेंबर
कापूस उत्पादकांना मदत देण्यासाठी निवडणूक आचारसंहितेचा बाऊ करणार्‍या राज्य सरकारला तसे निर्देश देण्यासाठी विदर्भ जनआंदोलन समितीने राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तशा आशयाची याचिका निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. नीला सत्यनारायण यांच्याकडे संविधानाच्या कलम २४३ के आणि २४३ झेड ए अनुसार, ही याचिका दाखल करण्यात आली असून त्यात शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी आदर्श आचारसंहितेत सूट देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना २० हजार रूपये प्रतिहेक्टर इतकी मदत देता यावी, यासाठी आचारसंहितेत ही सूट देण्यात यावी आणि तसे निर्देश सरकारला देण्यात यावे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
राज्यात सुमारे एक हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यासंदर्भात गेल्या सहा वर्षांत सरकारला अनेक अहवाल सादर करण्यात आले आहेत. असे असताना राज्य सरकारची मदत देण्याची तयारी आहे. पण, नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अशी मदत आताच जाहीर करता येणार नाही, असे सरकारकडून सांगितले जात आहे, असे या अर्जात म्हटले आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला निवेदने दिली. त्याला त्यांनी उत्तरही दिले आणि आचारसंहितेमुळे आम्ही हे पॅकेज तयार केले असले तरी जाहीर करू शकत नाही, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे आचारसंहितेत थोडी शिथिलता देत हे पॅकेज जाहीर करू द्यावे आणि अनेक शेतकर्‍यांचे प्राण वाचवावे, अशी मागणी या अर्जातून करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment