Saturday, 26 November 2011

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सोनिया गांधींना घालणार साकडे-सकाळ वृत्तसेवा

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सोनिया गांधींना घालणार साकडे-सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 27, 2011 AT 03:30 AM (IST)
Tags: farmers,   sonia gandhi,   vidarbha,  
यवतमाळ - शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी 25 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांसह दिल्लीत ठाण मांडून असून; वारंवार प्रयत्न करूनही त्यांची सं.पु.आ.च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची सुरक्षेच्या कारणावरून भेट नाकारण्यात आली. आता पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारला सोनिया गांधी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकतील, अशी अपेक्षा आहे. शेतकरी तोपर्यंत दिल्लीतच ठाण मांडून असतील, अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली.

25 नोव्हेंबरला वर्धा येथील खासदार दत्ता मेघे यांच्या "81, लोधीस्टेट' निवासस्थानी किशोर तिवारी यांनी भेट घेऊन त्यांना या सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. खासदार दत्ता मेघे यांनीही या विषयावर गंभीरपणे संसदेत आवाज उठविला तसेच पंतप्रधान व कृषिमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न केला. तथापि, कृषिमंत्री शरद पवार मुंबईत असून; पंतप्रधानांच्या कार्यालयातून अजूनही वेळ मिळालेला नाही. पुढील आठवड्यात विदर्भाचे सर्वपक्षीय खासदार मतभेद विसरून शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारला भरीव मदत करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दत्ता मेघे यांनी दिली.

किशोर तिवारी यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रकाश जावडेकर, हंसराज अहीर व संजय धोत्रे यांच्याशी संपर्क साधून; राज्य शासनाने प्रचंड नापिकीवर केंद्राच्या मदतीचा साधा प्रस्तावही सादर केलेला नाही, महाराष्ट्राची नोकरशाही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर उदासीन असल्याची माहिती दिली. त्यांनीही सोमवारी दोन्हीही सदनांमध्ये विशेष अधिकारांतर्गत या विषयावर सरकारला बोलते करण्याची तयारी सुरू केली.

"टीम अण्णा'ची तिवारींशी चर्चा
टीम अण्णाचे प्रमुख सहकारी अरविंद केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी किशोर तिवारी यांची हेली रोड कस्तुरबा गांधी मार्ग येथे भेट घेऊन महाराष्ट्राच्या कृषीसमस्येला व कृषी संकटासाठी राज्य सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती जाणून घेतली. कृषिक्षेत्रात राज्यकर्ते, नोकरशहा आणि वैज्ञानिकांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शेतकऱ्यांना महागडी शेती करावयास लावली आणि आत्महत्येच्या दारावर उभे केले, याचे सत्य जाणून घेतले. अरविंद केजरीवाल यांनी, "आम्ही भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आता सामाजिक न्यायासाठी रेटणार असून, शेतकऱ्यांच्या समस्येवर व त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे अधिकार अबाधित राहावे व कृषिक्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणलेली गुलामगिरी नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत', असे आश्‍वासन दिले. पुढील महिन्यात विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त क्षेत्राचा दौरा करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment